दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने अर्थात ईडीने अरविंद केजरिवाल यांना तब्बल 9 वेळा समन पाठवले होते. मात्र केजरीवाल यांनी त्या समन्सकडे दुर्लक्ष केले. यानंतर गुरुवारी ईडीचे अधिकारी 10वे समन घेऊन मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आणि जवळपास 2 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. ईडीची टीम केजरीवाल यांच्या निवासस्थानी होती, तेव्हाच आम आदमी पार्टीच्या लीगल टीमने सर्वोच्च न्यायालयात ई-फाइलिंगच्या माध्यमाने अपील केली. मात्र न्यायालयाने यासंदर्भात तत्काळ सुनवणीस नकार दिला. खरे तर अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, अशी शंका आप नेत्या आतिशी यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती.
केजरीवालांना केव्हा-केव्हा पाठवलं गेलं समन - - पहिले 02 नोव्हेंबर, 2023- दुसरे 18 डिसेंबर, 2023- तिसरे 03 जेनेवारी, 2024- चौथे 18 जानेवारी, 2024- पाचवे 02 फेब्रुवारी, 2024- सहावे 19 फेब्रुवारी, 2024- सातवे 26 फेब्रुवारी, 2024- आठवे 04 मार्च 2024- नववे 17 मार्च 2024
...अन् ईडीनं अॅक्शन घेतली - तत्पूर्वी, 21 मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या विरोधातील काही पुरावे सादर केले होते. तसेच, या काही पुराव्यांच्या आधारेच केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत असल्याचे म्हटले होते. याचवेळी, हे पुरावे केजरीवाल यांच्या वकिलाला दाखवू नये, अशी विनंतीही ईडीने न्यायालयाकडे केली होती.
केजरीवाल असे अडकले -मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे.