नवी दिल्ली: दिल्लीतील मद्य घोटाळ्यामुळे AAP सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) एकापाठोपाठ एक समन्स पाठवत आहे, पण केजरीवाल एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. आता ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना तिसऱ्यांना समन्स बजावले असून 3 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
यापूर्वी केजरीवाल यांना 21 डिसेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. पण, ते चौकशीसाठी हजर झालेच नाहीत. आता ईडीने त्यांना तिसऱ्यांना समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल गेल्या बुधवारी विपश्यनेसाठी होशियारपूरच्या महिलावली गावात असलेल्या धम्मध्वज विपश्यना साधना केंद्रात गेले आहेत. या केंद्रात ते पुढील 10 दिवस ध्यानधारणा करणार आहेत. यामुळे ते 21 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहू शकले नव्हते.
ईडीच्या समन्सवर मुख्यमंत्री केजरीवाल चौकशीला हजर न राहण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. या वर्षी 16 एप्रिल रोजी दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांची जवळपास 9 तास चौकशी केली होती. केंद्रीय एजन्सीने त्यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, परंतु 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण देत ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. यानंतर 18 डिसेंबर रोजी ईडीने त्यांना पुन्हा समन्स जारी केले आणि 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले, परंतु मुख्यमंत्री केजरीवाल पुन्हा एकदा ईडीसमोर हजर झाले नाहीत.