कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने देशावर निर्बंधांची टांगती तलवार ठेवली आहे. ओमायक्रॉनने आता 17 राज्यांत हजेरी लावली असून पाच दिवसांत रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. यामुळे मोदी सरकारने देखील उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक सारपडले असून देशातील रुग्णसंख्या 236 वर पोहोचली आहे. केंद्राने राज्यांना गाईडलाईन जारी केल्या आहेत.
ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या गर्दीमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामुळे ओमायक्रॉन आणि कोरोनाचा डेल्हा व्हेरिअंट वेगाने पसरण्याची भीती सर्व सरकारांना वाटत आहे. यामुळे दिल्ली सरकारने ख्रिसमस, नव वर्षाच्या पार्ट्यांच्या सेलिब्रेशनवर बंदी आणली आहे. तसेच लग्नातदेखील 200 हून अधिक वऱ्हाडी नसावेत असे निर्बंध लादले आहेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्या बैठक बोलविली आहे.
दुसरीकडे मोदी सरकारनेही बैठक बोलावली असून नवे निर्बंध लागू होणार का याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. दिल्लीच्या बाजारपेठेत मास्क घातलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. एटीएममध्ये देखील रांगा लावताना नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आदी गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व रेस्टॉरंट, बार आदींना क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहक घेता येणार आहेत.