नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून अनेकजण यातून संक्रमित होत आहेत. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी केजरीवाल सरकारने राज्यात ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज रात्री १० पासून पुढच्या सोमवारी सकाळी ५ पर्यंत हा लॉकडाऊन असेल.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करताच दिल्लीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. इतकचं नाही तर दिल्लीच्या गोल मार्केटमध्ये दारूच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी झाली. याठिकाणी एक-एक पेटी भरून तळीराम बिअर बॉट्लस घेऊन जात होते. फक्त गोल मार्केटमध्येच नाही तर दरियागंजसह अन्य भागातही हेच चित्र पाहायला मिळालं. दारूच्या दुकानाबाहेर लोकांची गर्दी दिसून आली.
गोल मार्केटमध्ये तळीरामांची गर्दी पाहता याठिकाणी पोलिसांना येऊन गर्दीचं नियोजन करावं लागलं. मागील वर्षी लॉकडाऊनपूर्वीही अशाच पद्धतीने दारू दुकानाबाहेर रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. दिल्लीत याआधी सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. शुक्रवारी संध्याकाळपासून ते सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन लावण्यात येत होते. परंतु परिस्थिती बिकट होत असल्याने एक आठवड्यासाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे.
लॉकडाऊनकाळात दिल्लीत फक्त अत्यावश्यक सेवेशी जोडलेल्या लोकांनाच सूट देण्यात आली आहे. मेडिकल, फळभाज्या, दूध आणि किराणा माल वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर करताच दिल्लीच्या बाजारपेठेत गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.
सोमवारी (आज) रात्री १० वाजल्यापासून ते २६ एप्रिल सकाळपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहणार आहे. या दरम्यान, विनाकारण बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच वीकेंड लॉकडाऊनसारखेच यावेळी निर्बंध असतील. एका आठवड्याच्या या लॉकडाऊनदरम्यान दिल्लीत कठोर निर्बंध लागू केले जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. तसंच सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले असून सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही अर्धी असेल.