Delhi Lok Sabha Election Result 2024 : दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागा भाजपाने पुन्हा जिंकल्या आहेत. २०२४ मध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यात युती झाली होती, तरीही निकाल २०१९ प्रमाणेच राहिला. दिल्लीत भाजपाच्या क्लीन स्वीपमुळे काँग्रेसला फारसा धक्का बसला नसला तरी, हे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा आहेत. 'आप'ने दिल्लीत सातपैकी चार जागांवर निवडणूक लढवली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी सुमारे ६ टक्क्यांनी वाढली पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
निवडणूक प्रचारात आपचा दिल्ली सरकारची कामगिरी आणि नेत्यांच्या अटकेवर भर होता. मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे सहानुभूतीची मतं मिळतील अशी पक्षाला आशा होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीनही मिळाला. असं असूनही, २०१९ च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्यात 'आप'ला यश आलं नाही. पुढच्या वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. केजरीवाल पुन्हा जेलमध्ये गेले, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही जेलमध्ये आहेत. अशा स्थितीत 'आप'ला आपल्या रणनीतीत बदल करण्याची गरज आहे.
दिल्लीत भाजपाशी टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आप यांनी युती केली होती. सात जागांपैकी 'आप'ने चार तर काँग्रेसने तीन जागा लढवल्या. २०१९ मध्ये AAP ला १८.२% मते मिळाली होती, तर यावेळी २४.१४% मतं मिळाली. दिल्लीत आपने केजरीवाल यांची अटक आणि त्यांच्या सरकारचं काम हा प्रसिद्धीचा मुद्दा बनवला. सहानुभूतीची मतं घेता यावीत म्हणून 'जेल का जवाब वोट से' असा नारा देण्यात आला. मात्र, पक्षाला आपल्या उद्दिष्टात यश आलं नसल्याचं निकालावरून दिसून आलं आहे.
AAP ने पंजाबमध्ये तीन जागा जिंकल्या, २०१९ च्या तुलनेत तिप्पट आहेत. संगरूरमधून गुरमीत सिंग मीत हेयर, आनंदपूर साहिबमधून मलविंदर सिंग कांग आणि होशियारपूरमधून राजकुमार चब्बेवाल विजयी झाले. २०१९ मध्ये केवळ संगरूरमध्ये 'आप'चा विजय झाला होता. राज्यात पक्षाची मतांची टक्केवारी ७.३८% वरून २६.०२% झाली आहे. आपच्या मतांचा वाटा काँग्रेसच्या २६.३% पेक्षा फक्त ०.२८% कमी होता, परंतु काँग्रेसने सात जागा जिंकल्या.
पंजाबमध्ये आपचा प्रचार मोफत वीज आणि पाणी, शाळा आणि मोहल्ला क्लिनिकचा विकास यावर आधारित होता. आपचे आमदार हे गायब असल्याची तक्रार मतदारांनी केली आहे. भगवंत मान यांच्या सरकारने महिलांना पेन्शन देण्याचं आश्वासनही पूर्ण केलं नाही.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे दर्शवतात की, AAP ला आपली रणनीती बदलण्याची गरज आहे. पक्षाचे प्रमुख नेते जेलमध्ये असल्याने पक्षाच्या मनोधैर्यावरही परिणाम होत आहे. अशा स्थितीत दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला आपली गमावलेली ताकद परत मिळवावी लागणार आहे.