नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे. दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागेवर मागील निवडणुकीत भाजपाने एकहाती कब्जा केला होता. त्यामुळे या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. 2009 मध्ये सर्व जागांवर कब्जा करणाऱ्या काँग्रेसला 2014 मध्ये केवळ 15 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले आणि काँग्रेसचा एकही उमेदवार त्या निवडणुकीत विजयी झाला नाही.
दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत आहे. काँग्रेस व आप हे एकमेकांची किती मते ओढतात. यावरच भाजपाचे यश अवलंबून आहे. या निवडणुकीत काही जागा गमाविल्यास भाजपाला धक्का बसेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या मात्र आघाडी फिस्कटल्याने अखेर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र्यपणे दिल्ली लोकसभा निवडणूक लढवत आहे.
नवी दिल्ली
भाजपाच्या मीनाक्षी लेखी येथील खासदार आहेत. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आव्हान दिले आहे. तर आपने ब्रिजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे
चांदणी चौक
चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत.
पूर्व दिल्ली
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे.
पश्चिम दिल्ली
काँग्रेसने पश्चिम दिल्ली येथून महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने प्रवेश वर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आहे. आपने बलबीरसिंग जाखड यांना उमेदवारी दिली आहे.
दक्षिण दिल्ली
काँग्रेसनं बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. भाजपाने रमेश बिधुडी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. आपने राघव चढ्ढा यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर-पूर्व दिल्ली
उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
उत्तर-पश्चिम दिल्ली
भाजपाने या मतदारसंघात पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने राजेश लिलोठिया यांना उमेदवारी दिली आहे. तर आपने गुग्गन सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणारदिल्लीतल्या चांदनी चौक मतदारसंघाला देशाचा मूड अतिशय उत्तमपणे समजतो असं मानलं जातं. गेल्या 15 लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास बहुतांश वेळा चांदनी चौकमध्ये जिंकणाऱ्या पक्षानंच केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. इतिहासावर नजर टाकल्यास केवळ दोनवेळाच चांदनी चौकवासीयांचा अंदाज चुकला आहे. यंदा चांदनी चौकमध्ये तिहेरी लढत आहे. या ठिकाणी आम आदमा पार्टी, काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत. चांदनी चौकचा निवडणूक इतिहास मोठा रंजक आहे. या मतदारसंघातून 9 वेळा काँग्रेसचे, 4 वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रत्येकी एक-एकदा जनसंघ आणि जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत.