Delhi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान झाले असून, दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. आगामी सहाव्या टप्प्यात राजधानीत दिल्लीतील सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, या मतदानापूर्वी आज(दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका परिसरात सभा घेतली. यावेळी त्यांनी मद्य घोटाळा आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यावरुन आप-काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा असो, भ्रष्टाचाऱ्यांकडून एक एक पैसा वसूल केला जाईल. ज्याने देशाची लूट केली, त्याला ती परत करावीच लागेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतातील जनतेला काँग्रेस मॉडेल आणि भाजप मॉडेलमधील फरक स्पष्टपणे दिसतोय. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या लोकांकडे पुढचा विचार करण्याची वेळ किंवा क्षमता नाही. या लोकांनी 60 वर्षांपासून भारताच्या क्षमतेवर अन्याय केला. मी तर म्हणेन की, या लोकांनी गुन्हेगारी कृत्येच केली आहेत. 140 कोटींचा एवढा मोठा देश, भारताला आवश्यक तेवढा वेग आणि स्केल भारतीय जनता पक्षाचे सरकारच देऊ शकते," असा दावाही त्यांनी यावेळी केला.
यावेळी मोदींनी सरकारच्या कामाचा पाढाच वाचला. ते म्हणाले, "काँग्रेसला दररोज 12 किलोमीटर महामार्ग बांधता आला, तर आमचे सरकारने दररोज सुमारे 30 किलोमीटर महामार्ग बनवत आहे. काँग्रेसला 60 वर्षात जास्तीत जास्त 70 विमानतळ बांधता आले, आम्ही 10 वर्षात 70 नवीन विमानतळ उभारले. काँग्रेसला 60 वर्षांत 380 वैद्यकीय महाविद्यालये बांधता आली, आम्ही अवघ्या 10 वर्षांत 325 हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली, काँग्रेसच्या काळात 7 AIIMS होते, आज 22 हून अधिक AIIMS आहेत, काँग्रेसच्या काळात 75 टक्क्यांहून अधिक लोकांकडे नळ कनेक्शन नव्हते, आज 75 टक्के लोकांच्या घरात नळाला पाणी आहे, काँग्रेसने 60 वर्षात 14 कोटींहून कमी गॅस कनेक्शन दिले, आम्ही 10 वर्षात 18 कोटीहून अधिक नवीन गॅस कनेक्शन दिले आहेत."
यावेळी पंतप्रधानांनी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "काँग्रेसने देशातील एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांचे उच्च शिक्षणातील अधिकार हिरावून घेण्याचे काम केले. काँग्रेसने आपल्या एससी-एसटी-ओबीसी, दलित, आदिवासी बांधवांवर किती अन्याय केला, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. काँग्रेस सरकारने शांतपणे एक खेळी केली. अचानक जामिया मिलिया विद्यापीठाला अल्पसंख्याक संस्था म्हणून घोषित केले, त्यामुळे मुस्लिमांना 50 टक्के आरक्षण लागू झाले," अशी टीका त्यांनी केली.
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र