दिल्ली: दिल्लीतल्या अँड्र्यूज उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी वाचवलं आहे. आयुष्याला कंटाळून जीव देत असल्याचं हा तरुण म्हणत होता. याबद्दलची सूचना योग्य वेळी पोलिसांना मिळाली. त्यामुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी वेगानं हालचाली केल्यानं तरुणाचा जीव वाचला.
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांनी उड्डाणपुलाच्या खाली त्वरित जाळी धरली. यादरम्यान तरुणाचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू होता. तरुणाशी संवाद साधत पोलिसांनी त्याला गुंतवून ठेवलं. त्यानंतर तरुणाला उड्डाणपुलावरूनच मागे खेचण्यात आलं. हा तरुण मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'संध्याकाळी टेरेसवर फिरत असताना अचानक या तरुणाकडे लक्ष गेलं. याची माहिती तत्काळ एसएचओंना दिली. त्यानंतर ५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी आले. तरुण दारूच्या नशेत होता. बेरोजगार असल्यानं त्रासलेला तरुण आत्महत्या करणार होता. एक जीव वाचवला गेला,' असं लांबा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.