आपल्या सासऱ्यांचा क्षयरोग (टीबी) बरा करण्यासाठी त्यांना कासव खायला देऊ पाहणाऱ्या एका जावयला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. येथील चाणक्यपुरी परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या अमन याने आपल्या सासऱ्यांचा क्षयरोग बरा करण्यासाठी पाच कासवं विकत घेतली होती. कासवाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग बरा होतो, असे त्याला कोणीतरी सांगितले होते. त्यामुळे अमनने एका ठिकाणहून तीन हजार रुपयांना इंडियन सॉफ्टशेल प्रजातीची कासवं विकत घेतली. ही कासवं घेऊन तो कारने आपल्या घरी जात असताना सायमल बोलिवर रस्त्यावर पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, पोलिसांना बघून घाबरलेल्या अमन आणि त्याच्या मित्रांनी नाकाबंदीच्या अलीकडे काही अंतरावर कार सोडून पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीच्या पुढच्या सीटच्याखाली ठेवलेल्या गोणीत पाच कासवे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी वन्यजीव कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून अमनला शोधायला सुरुवात केली. काही वेळानंतर तो पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर केलेल्या चौकशीत अमनने आपण ही कासवे सासऱ्यांच्या उपचारासाठी आणल्याचे सांगितले. माझ्या सासऱ्यांना टीबी आहे. टीबी बरा होण्यासाठी कासवाचे मांस खातात, असे मी ऐकले होते. त्यामुळेच आपण ही कासवे विकत घेतल्याचे त्याने म्हटले. दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून अमनने यापूर्वीही अशाप्रकारे कासवं विकत आणली होती का, याचा शोध घेत आहेत. ही कासवं दुर्मिळ प्रजातीची असल्याने त्यांना पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
आजारी सासऱ्यांना खायला द्यायचं होतं कासव; जावई गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 12:07 PM