दिल्लीतआपने महापालिका निवडणूक जिंकली, भाजपाच्या हातून तिन्ही महापालिकांची एक केलेली महापालिका खेचून आणली. परंतू, महापौर बसविण्यासाठी आपला ८४ दिवसांची वाट पहावी लागली होती. आज जवळपास ३०-३५ मतांनी आपच्या शैली ओबेरॉय या महापौरपदी आणि आले मोहम्मद इक्बाल उपमहापौरपदी निवडून आले आहेत. परंतू यातील ट्विस्ट एवढ्यावरच थांबलेला नाहीय, तर शैली या पुढचे ३८ दिवसच महापौरपदी राहणार आहेत.
दिल्लीमध्ये महापालिकेचे नियम जरा वेगळे आहेत. इथे दर एक वर्षाला महापौर बदलला जातो. यामुळे दर वर्षी दिल्ली महापौरपदासाठी निवडणूक घ्यावी लागते. शैली यांच्या महापौरपदाची मुदत ही ३१ मार्चला संपणार आहे. एक एप्रिलला पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. DMC कायद्याच्या कलम 2(67) नुसार दिल्ली महापालिकेचे वर्ष एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते. अशा प्रकारे हे वर्ष पुढील वर्षी ३१ मार्च रोजी संपते.
अशाप्रकारे शैली ओबेरॉय यांची 22 फेब्रुवारी रोजी महापौरपदी निवड झाली असून, त्यांचा कार्यकाळ 31 मार्च रोजी संपणार आहे. अशाप्रकारे त्यांना केवळ 38 दिवस महापौरपदावर राहून काम करता येणार आहे.
शैली ओबेरॉय, 39, पश्चिम दिल्लीच्या पूर्व पटेल नगर प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्या दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्या इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या आजीवन सदस्याही आहेत. ओबेरॉय यांनी इग्नूच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पीएचडी केली आहे. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि सन्मान आहेत जे त्यांना विविध परिषदांमध्ये मिळाले.
आपचे उपमहापौरपदाचे उमेदवार आले मोहम्मद इक्बाल यांना 147 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवार कमल बागडी यांना 116 मते मिळाली. एकूण 265 मतांपैकी २ मते अवैध ठरली. परंतू महापौर निवडणुकीत आपच्या शेली ओबेरॉय जिंकल्या आहेत. त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपने त्यांच्या विरोधात रेखा गुप्ता यांना उमेदवारी दिली. त्यांना 116 मते मिळाली.