नवी दिल्ली - दिल्ली महापालिका निवडणूक निकालानंतर ४८ तासांत आम आदमी पक्षात सहभागी होणाऱ्या ३ नगरसेवकांपैकी १ अली मेहदी पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेत. अली मेहदीसह ३ नगरसेवकांनी आपमध्ये प्रवेश करताच स्थानिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला. संतापलेल्या नागरिकांनी अली मेहद यांचा पुतळाही जाळला. मेहदी मुस्तफाबाद येथील काँग्रेसचे माजी आमदार हसन अहमद यांचे चिरंजीव आहेत.
अली मेहद यांच्यावर दिल्ली काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर मेहदी यांनी स्वत:चा व्हिडिओ ट्विट करून ही माहिती दिली. मेहदी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, मी राहुल गांधींचा कार्यकर्ता आहे. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला कुठलेही पद नको. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि स्थानिक जनतेची हात जोडून माफी मागतो असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत मी काँग्रेस पक्षात होतो, पक्षात आहे आणि यापुढेही काँग्रेसमध्येच राहणार आहे. काँग्रेस माझ्या ह्दयात आहे. माझे वडील ४० वर्षापासून काँग्रेसमध्ये आहेत. माझ्याकडून जी चूक झाली त्याबद्दल मी क्षमस्व आहे असं अली मेहदी यांनी व्हिडिओत म्हटलं. आपमध्ये जाणाऱ्या मुस्तफाबादच्या नगरसेविका सबीला बेगम आणि बृजपुरी येथील नगरसेविका नाजिया खातून यांच्यासोबत ब्लॉक अध्यक्ष अलीम अंसारी, जावेद चौधरी, अशोक बघेल, दिल्ली काँग्रेस कार्यकारणी सदस्य हाजी खुशनूद यांनी आपमध्ये प्रवेश केला.
महापालिकेत पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे २ नगरसेविकांनी पक्ष बदलल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या ९ वरून ७ पर्यंत घटली आहे. तर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांची संख्या १३४ वरून १३६ झाली आहे. ज्याचा फायदा महापालिका महापौरपदासाठी आपला होणार आहे.
काय म्हणाले होते अली मेहदी?आम आदमी पक्षात प्रवेश करताना अली मेहदी म्हणाले होते की, स्थानिक वार्डाच्या विकासासाठी मी आणि अन्य २ नगरसेवकांनी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी आपच्या मुख्यालयात पक्षाचे आमदार आणि प्रभारी दुर्गेश पाठक आणि नेते आदिल अहमद खान यांच्या उपस्थितीत अली मेहदी आणि २ नगरसेवकांनी आपमध्ये प्रवेश घेतला. आपच्या नेत्यांनी या सर्वांना पक्षाचं उपरणं घालत पार्टीत त्यांचे स्वागत केले.