नवी दिल्ली - दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. आतापर्यंत ७८ हून अधिक जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार जिंकले आहेत. भाजपा ५७, काँग्रेस ४ आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. दिल्ली महापालिकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा चालला असून आप स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येते.
दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या वार्डात कुणाची कामगिरी सरस राहिली त्यावर अनेकांची नजर आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या वार्डात ४ पैकी ३ भाजपा आणि एका जागेवर आप आघाडीवर आहे. सत्येंद्र जैन ज्यांच्यावर कथित घोटाळ्याचा आरोप झालाय. ते सध्या जेलमध्ये बंद आहेत. त्यांच्या वार्डात सर्व ठिकाणी भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांच्या वार्डात ४ पैकी ३ जागांवर आप पिछाडीवर आहे.
आम आदमी पक्षाला सर्वात मोठा विजय एससी एसटी मंत्री राजकुमार आनंद यांच्या मतदारसंघात मिळाला आहे. त्याठिकाणी चारही जागांवर आपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या मतदारसंघात ४ पैकी २ ठिकाणी आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस, भाजपा उमेदवार विजयाच्या दिशेने आघाडीवर आहेत.कोण आहेत सत्येंद्र जैन? मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन कैद आहेत. सत्येंद्र जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आल्याचा दावा ईडीने केला होता. छाप्यांमध्ये प्रकाश ज्वेलर्सकडे 2.23 कोटी रोख सापडले होते. अन्य सहकारी वैभव जैन यांच्याकडे 41.5 लाख रोख आणि 133 सोन्याची नाणी सापडली आहेत. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडली होती. अलीकडेच सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात एका माणसाकडून मालिश करून घेत असल्याचा व्हिडिओ भाजपाने व्हायरल केला होता. त्यावरून आपची कोंडी करण्यात आली होती.