पराभवानंतर धुसफूस; दिल्ली निकालानंतर भाजप खासदारांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:39 AM2022-12-08T08:39:26+5:302022-12-08T08:39:49+5:30
दिल्ली प्रमुख आदेश गुप्तांवर टांगती तलवार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : येथील महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेत्यांना धक्का बसला आहे, परंतु मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या मतदारसंघातील अनेक वॉर्ड भाजपने जिंकल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे भाजपमध्ये या पराभवावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याने पक्षाचे दिल्ली प्रमुख आदेश गुप्ता चिंतेत आहेत. ते पटेल नगरमध्ये राहतात आणि तेथील चारही वॉर्ड ‘आप’ने जिंकले आहेत. अशाच प्रकारे भाजपच्या सातपैकी पाच खासदारांनाही काळजीने घेरले आहे.
सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या मीनाक्षी लेखी या सांस्कृतिक राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात २५ वॉर्ड आहेत. त्या त्यांच्या मतदारसंघाच्या प्रभारी होत्या. मात्र, भाजपला केवळ ५ प्रभागांत विजय मिळविता आला. दुसरे खासदार हंसराज हंस हे ४३ पैकी केवळ १४ वॉर्डात पक्षाला विजयी करू शकले. परवेश वर्मा यांनाही ३४ टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्ड मिळाले नाहीत. त्यांना ३८ पैकी १३ वॉर्डांत यश मिळाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भाजपची पुनर्रचना करावी, तसेच बहुसंख्य खासदारांना तिकीट नाकारण्यात यावे, अशी मागणी आहे.