नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमधून आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंतच्या कलामध्ये महानगर भाजपा ११८ आणि आप १२० जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने ७ जागांवर आघाडी घेतली आहे.
याआधी पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तीन महापालिकांमध्ये दिल्लीची विभागणी करण्यात आलेली होती. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण महानगरपालिका विलीन केल्या होत्या. त्यानंतर या संयुक्त महानगरपालिकेच्या २५० जागांसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला मतदान झाले होते. सुमारे ५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
दिल्ली विधानसभेत आपच्या अरविंद केजरिवालांची एकहाती सत्ता आहे, परंतु महापालिकेत काही आपला सत्ता मिळविता आली नव्हती. त्यातच दिल्लीबरोबर गुजरातचीही निवडणूक लागल्याने भाजपाने आपची कोंडी केल्याचे चित्र होते. मात्र दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपची सत्ता येईल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. इंडिया टुडे एक्सिस माइ इंडियाच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आपला १४९ ते १७१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर सत्ताधारी भाजपाला ६९ ते ९१ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.