गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला दिल्ली महापालिकेतील गोंधळ काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. स्थायी समित्यांच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी एका मताच्या राजकारणाचा खेळ रंगला आहे. मतदानापूर्वी भाजपानेआपचा नगरसेवक फोडला तर आपच्या महापौरांनी मतदानावेळी भाजपाचे एक मतच बाद ठरविले आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या सेक्रेटरी ऑफिसने हे मत अवैध ठरविण्यास नकार दिला आहे.
यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरु झाली आहे. मतमोजणी सुरु झाली आहे, परंतू महापौर शैली ओबेऱॉय यांनी एक मत बाद केल्याने भाजपाचे सदस्य गोंधळ करत आहेत. म्युनिसिपल सेक्रेटरी महापौरांच्या या घोषणेवर समहत नाहीत. भाजपा सांगतेय की महापौरांना मत बाद असल्याचे ठरविण्याचा कोणताही अधिकार नाहीय. एमसीडीच्या स्टँडिंग कमिटीच्या सदस्यांसाठीच्या मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया संपली आहे. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यादरम्यान भाजपाच्या पाच जणांनी आपला मतदान केल्याचा दावा आपने केला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भाजपाला तीन उमेदवार जिंकवण्यासाठी प्रत्येकी ३५ असे १०५ मते लागणार आहेत. तर आपला चार उमेदवार जिंकवण्यासाठी १४० मते हवी आहेत. परंतू आपकडे १३४ मतेच होती. अशातच एकतर भाजपाचे सदस्य फोडणे किंवा काँग्रेसचे सदस्य आपल्या बाजुने घेणे हे दोन पर्याय आपकडे होते. परंतू, महापौर निवडीवेळी काँग्रेसच्या सात सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला होता. यामुळे भाजपाला एका मतासाठी एकच नगरसेवक फोडणे सोपे गेले होते. भाजपाने आपचे नगरसेवक पवन सहरावत यांनाच फोडले आणि भाजपमध्ये सहभागी केले.
सहरावत जेव्हा मतदानासाठी उठले तेव्हा आपच्या नगरसेवकांना त्यांना गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या. तर भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजुने घोषणाबाजी केली.