नवी दिल्ली - दिल्ली एमसीडी निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने १३४ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाचा पराभव झाला आहे. भाजपाला केवळ १०४ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, या विजयानंतर देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपाला हरवले असा खोचक टोला आम आदमी पक्षाने भाजपाला लगावला आहे.
एमसीडीमधील विजयामुळे आम आदमी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. आपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चड्डा यांनी या निकालांनंतर भाजपाला खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने काम आणि विकासाला मत दिले आहे. आपण काम करणाऱ्यांनां मतं देतो, बदनाम करणाऱ्यांना देत नाही, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे, असे राघव चड्डा म्हणाले.
एमसीडीमध्ये आप आणि भाजपामध्ये थेट लढाई होती. भाजपाने ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री आणि ईडी व सीबीआयलाही मैदानात उतरवले होते. मात्र अखेरीस सत्याचाच विजय झाला. काँग्रेसने आधी दिल्लीत १५ वर्षे ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला पराभूत केले. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
भाजपाला दिल्लीच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे. जे विकासासाठी काम करतात. त्यांनाच जनतेने मत दिले आहे. दिल्लीने आज तो चिखल साफ केला आहे जो अरविंद केजरीवाल यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता आम्ही दिल्लीला जगातील सर्वात सुंदर शहरामध्ये बदलणार आहोत.