आज दिल्ली महापालिकेच्या निवडणुकींचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभेत आपच्या अरविंद केजरिवालांची एकहाती सत्ता होती, परंतू महापालिकेत काही आपला सत्ता मिळविता आली नव्हती. त्यातच दिल्लीबरोबर गुजरातचीही निवडणूक लागल्याने भाजपाने आपची कोंडी केल्याचे चित्र होते. परंतू, इंडिया टुडे एक्सिस माइ इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आप दिल्ली महापालिकेत भाजपाची सत्ता उलथवून टाकताना दिसत आहे.
दिल्लीत आपला १४९ ते १७१ जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजपाला ६९ ते ९१ जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळताना दिसत आहेत. तसेच इतरांच्या खात्यात ५ ते ९ जागा जाताना दिसत आहेत. दिल्ली एमसीडीच्या २५० जागांवर मतदान झाले होते. आपला दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. आपला ४६ टक्के महिलांनी आणि ४० टक्के पुरुषांनी मतदान केले आहे. भाजपाला ३४ टक्के महिलांनी आणि ३६ टक्के पुरुषांनी मतदान केल्याचे यातून दिसत आहे.
एकूण मतदानाची टक्केवारीतदेखील मोठा फरक दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपाला ३५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर आपला ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १० टक्के मते मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
या निवडणुकीपूर्वी एमसीडी पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तीन महापालिकांमध्ये दिल्लीची विभागणी करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण महानगरपालिका विलीन केल्या होत्या. म्हणजेच यावेळी दिल्लीत तीन ऐवजी यावर्षीपासून एकच महापौर असेल. तर 272 जागा 250 पर्यंत कमी झाल्या होत्या.
दिल्लीत भाजपाला धक्का बसताना दिसत असताना गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल येणे बाकी आहे.