दिल्लीच्या महापालिकेमध्ये मोठा राडा झाला आहे. बुधवारी दिवसभरात महापौर, उपमहापौर निवडणूक पार पडली. मात्र, स्थायी समितीच्या निवडीसाठी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेला हंगामा गुरुवारी सकाळी सात वाजले तरी काही थांबलेला नव्हता. नगरसेवक, नगरसेविकांचा रात्रभर धिंगाणा सुरु होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की, हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीत सहा स्थायी समितींवरील सदस्यांची निवडणूक होती. स्थायी समिती निवडणूक रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांनी मतपेटीच चोरल्याचा आरोप आपच्या नेत्या आतिषी यांनी केला आहे. दिल्ली महापालिकेमध्ये सायंकाळपासून कार्यवाही सुरु होती. परंतू, भाजपाचे नगरसेवक कामकाजात बाधा आणण्यासाठी गोंधळ घालत होते. यामुळे वारंवार कामकाज थांबविण्यात येत होते. काहीवेळा १५ मिनिटांसाठी काहीवेळा तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येत होते.
या काळात भाजपाकडून रघुपति राघव राजा रामचे नारे लावले जात होते. यामुळे स्थायी समितीत्या सदस्यांसाठी मतदान घेता आलेले नाही. यादरम्यान दोन्ही बाजूकडून एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. मध्यरात्रीच्या सुमारास सभागृहाचे कामकाज पुन्हा तासाभरासाठी स्थगित करण्यात आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की, हाणामारी झाली. यामध्ये महिला नगरसेविकाही एकमेकींना भिडल्या.
आम आदमी पक्ष रात्रीच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड व्हावी म्हणून ठाम राहिला होता. सिविक सेंटरबाहेर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांची जमवाजमव सुरु झाली होती. राज्यसभा खासदार संजय सिंह आपचे नेतृत्व करत आहेत, तर विजेंदर गुप्ता भाजपचे नेतृत्व करत आहेत.
गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करून नव्याने मतपत्रिका मागवून स्थायी समितीच्या निवडणुका नव्याने पार पाडाव्यात, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे. तर आप आताच निवडणुका होणार म्हणून अडून बसला आहे. सौरभ भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने सभागृहाच्या पहिल्या बैठकीतच निवडणुका घेण्यास सांगितले आहे, त्यामुळे आम्ही सभा पुढे ढकलू शकत नाही, असे म्हटले आहे.