Delhi MCD Result: दिल्लीतील एका जागेवर AAP-BJPमध्ये झाली 'टाय', आला नवा ट्विस्ट; कोण जिंकलं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:30 PM2022-12-07T15:30:57+5:302022-12-07T15:32:08+5:30
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आज निकाल समोर आले आहेत.
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) निवडणुकांचे आज निकाल समोर आले. यामध्ये एक्झिट पोलप्रमाणे 'आप'नेभाजपाला 15 वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले आहे. आप बहुमताने सत्तेत आली आहे. असे असले तरी भाजपाने आपला जबरदस्त टक्कर दिली आहे. दिल्ली जिंकली तरी आपला मतांच्या गणितात मार खावा लागला आहे. एवढा की उद्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव देखील पत्करावा लागू शकतो. काँग्रेसबद्दल भाष्य करायचे झाले तर पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. आम आदमी पार्टीने 134 तर भारतीय जनता पक्षाने 104 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. मात्र मलका गंजमधील जागेच्या निकालाने सगळ्यांचेच लक्ष वेधले.
फेरमतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी
दरम्यान, दिल्लीतील मलका गंजमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. खरं तर इथे दोन्हीही पक्षातील उमेदवारांना समान मतं मिळाली. प्रथम मोजणीत दोघांनाही 10035, 10035 अशी मते मिळाली. नंतर फेरमतमोजणी झाली, त्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपकडून रेखा येथे रिंगणात होत्या. दुसरीकडे गुड्डी देवी जाटव या आम आदमी पक्षाकडून उमेदवार होत्या. सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. कधी मोजणीत रेखा यांनी आघाडी घेतली तर कधी गुड्डी यांनी विजयाकडे कूच केली. मात्र फेरमतमोजणीत भाजपच्या रेखा 482 मतांनी विजयी झाल्या आहेत. रेखा यांना १३,८५५ तर गुड्डी देवी जाटव यांना १३,३७३ मते मिळाली.
खरं तर 'आप'ला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 42 टक्के मते मिळाली आहेत. परंतु, विधानसभेला 53.57 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच आपने दोन वर्षांत आपने तब्बल 11 टक्के मते गमावली आहेत. आजचा विजय आपला जल्लोष करण्यासाठी पुरेसा असला तरी केजरीवालांना टेन्शन देण्यासाठी देखील पुरून उरणारा आहे.
'आप'च्या मतात घट
निवडणूक आयोगानुसार आपला दिल्लीत 42.35 टक्के, भाजपाला 39.23 टक्के आणि काँग्रेसला 12.6 टक्के मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना 2.86 टक्के मते मिळाली. बसपाला 1.65 टक्के मते मिळाली. जर 2020 मध्ये झालेल्या विधानसभेचा विचार केला तर भाजपाने तेव्हा 38.51 टक्के मते आणि काँग्रेसने 4.26 टक्के मते मिळविली होती. दोन्ही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जवळपास समानच होती, मग आपची 11 टक्के मते गेली कुठे? भाजपाला 0.72 टक्के मते जास्त मिळाली आहेत. तर काँग्रेसला 7.9 टक्के मते अधिक मिळाली आहेत. 'आप'ने भलेही जागांमध्ये भाजपाला मात दिलेली असली तरी मतांच्या गणितात तोटा झाला आहे. आणखी तीन वर्षांनी ही जादाची मते वाढली तर आपची सत्ता कमी अधिक फरकाने जाण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"