Metro Saree Stuck Women Died ( Marathi News ) मेट्रोच्या गेटमध्ये एका महिलेची साडी अडकून तिचा मृत्यू झाल्याची घटना 14 डिसेंबर रोजी घडली होती. मेट्रो गेटमध्ये साडी अडकल्यानंतर मेट्रो सुरू झाल्याने महिला मेट्रोसोबत प्लॅटफॉर्मवर काही अंतरापर्यंत ओढली गेली. लोकांनी मेट्रो थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही आणि प्लॅटफॉर्मच्या शेवटी ती महिला मेट्रो ट्रॅकवर पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. महिलेला सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. यासंबंधात पुढील अपडेट आली असून, मेट्रो प्रशासनाकडून त्या महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाईपोटी ठराविक रक्कम देण्यात येणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने सांगितले आहे की, गेल्या शनिवारी दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर मेट्रो ट्रेनच्या गेटमध्ये साडी अडकल्यामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांचे मन हेलावले. अपघाताच्या वेळी महिलेचा 10 वर्षांचा मुलगा तिच्यासोबत उपस्थित होता.
DMRC अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मेट्रो रेल्वे नियम, 2017 च्या तरतुदींनुसार, मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. तसेच महिलेच्या अल्पवयीन मुलांना मानवतावादी मदत म्हणून 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने, DMRC नुकसान भरपाई देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरू शकते.
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त तपास करत आहेत
रीना असे मृत महिलेचे नाव असून ती नांगलोई येथील रहिवासी आहे. या महिलेच्या पतीचे फार पूर्वीच निधन झाले होते. ती तिच्या दोन मुलांसह राहत होती.महिला आणि तिची दोन मुले सोडून कुटुंबात दुसरे कोणीही नाही. मुलांचा सांभाळ करण्यासाठी नातेवाईक स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आहेत. मेट्रो स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पहिल्यांदा मेट्रोच्या डब्यात शिरली पण मुलाला घेण्यासाठी परत आली, त्यानंतर ही घटना घडली. सध्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त महिलेच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.