Kailash Gahlot quits AAP : नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले.
दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.
आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवताना कैलाश गेहलोत यांचेही नाव या पदासाठी पुढे येत होते. मात्र, या मोठ्या जबाबदारीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती.
दरम्यान, आतिशी सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात आपच्या अंतर्गत समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच, यावर मात करण्याची गरज असल्याचे कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून झालेल्या विवादाचा संदर्भ देताना त्यांनी शीशमहल असा शब्दाचा वापर केला आहे.
वचनबद्धता पूर्ण करण्यात अपयशी - कैलाश गेहलोत याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश कैलाश गेहलोत यांनी अधोरेखित केले. आम्ही जनतेला स्वच्छ यमुनेचे आश्वासन दिले होते, पण ती वचनबद्धता पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचे कैलाश गेहलोत यांनी सांगितले आहे. तसेच, कैलाश गेहलोत पुढे म्हणाले की, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील सततचा संघर्ष शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.