नवी दिल्ली - दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. त्यानंतर आता दिल्लीमध्ये गौतम गंभीर बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लागले आहेत. 'आपण यांना पाहिलत का? इंदौरमध्ये जिलेबी खाताना यांना शेवटचं पाहिलं आहे. संपूर्ण दिल्ली यांना शोधत आहे' अशा आशयाचे पोस्टर्स दिल्लीमध्ये लावण्यात आले आहेत.
दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे. यासाठी दिल्ली सरकारने राज्याचे सर्व खासदार व एमसीडी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र गौतम गंभीरभारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी साम्यात समालोचनची भूमिका निभावतो आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा गंभीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते. मात्र मला शिव्या देऊन दिल्लीतील प्रदूषण कमी होत असे तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या असं म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना गंभीरने ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले.
गौतम गंभीर म्हणाला की, मी माझ्या मतदारसंघ व शहरातील अनेक काम केली आहेत. त्यामध्ये गाजीपूरमधील कचरा हटविणे, ईडीएमसी शाळेमध्ये डिजिटल वर्ग तयार करणे तसेच महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावणे किंवा गरीबांसाठी मोफत जेवणाची सोय करणे यांसारखी काम मी केली असल्याचे गौतम गंभीरने सांगितले. त्याचप्रमाणे पूर्व दिल्लीमधील कार्यालयात मी सकाळी 11 वाजता जातो व लोकांच्या समस्या जाणून घेतो असं गंभीरने नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.
दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.
दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. मात्र आता या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.