नवी दिल्ली - लहान मुलांना सर्दी-खोकला (Cough) हा त्रास हमखास होत असतो. अशावेळी पालक माहीत असलेलं एखादं कफ सिरप मुलांना देतात किंवा मग जास्तच बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतात. खोकल्यावर डॉक्टर देखील आपल्याला कफ सिरप (Cough syrup) देतात. पण हेच कफ सिरप आता 3 मुलांच्या जीवावर बेतलं आहे. खोकल्याचं औषध घेतल्यामुळे 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये खोकल्याचं औषध प्यायल्याने 16 मुलं आजारी पडली आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपच्या साईड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे. यानंतर केंद्र सरकारच्या डायरेक्टर जनरल हेल्थ सर्व्हिसेजने दिल्लीच्या DGHS निर्देश दिले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डिस्ट्रोमेथोर्फन सिरप देऊ नये अशी नोटीस मोहल्ला क्लिनिक आणि डिस्पेन्सरीना जारी करण्यात आली आहे. डॉ. अनिल गोयल डिस्ट्रोमेथोर्फन सिरप कधी आणि कोणत्या मुलांना दिलं गेलं पाहिजे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सिरप प्याल्यानंतर 16 मुलं आजारी
डिस्ट्रोमेथोर्फन सिरप खूप जास्त खोकला असेल तर दिलं जातं. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध दिलं जात नाही असं डॉ. अनिल गोयल यांनी म्हटलं आहे. सिरप प्याल्यानंतर 16 मुलं आजारी पडली. त्यात दोन वर्षांपेक्षा लहान मुलांचा समावेश आहे. तपासानुसार ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं वयही दोन ते तीन वर्षेच आहे. हे औषध देताना खूप काळजी घ्यावी लागते. याचे मर्यादित डोस द्यायला हवेत. मुलांना औषधाचा किती डोस देण्यात आला आणि कुठे याचा तपास व्हायला हवा असंही ते म्हणाले.
मुलांच्या मृत्यूने परिसरात खळबळ
औषध देताना काही चूक तर झाली नाही ना, ज्याचा परिणाम मुलांना भोगावा लागला, हेसुद्धा तपासायला हवं असं डॉ. गोयल यांनी म्हटलं आहे. डिस्ट्रोमेथोर्फन सिरप प्यायल्यानंतर त्यावर पाणी प्यायचं नाही. तसेच हे सिरप प्यायल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी हे देखील सांगणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुलांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून पालकांना देखील मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.