Ayushman Arogya Mandir : नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. तर आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता दिल्लीत भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अशातच भाजप सत्तेत आल्यानंतर मागील आप सरकारने लागू केलेल्या योजनांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
मुख्य सचिवांनी आरोग्य विभागाला आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करण्यासाठी कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ही योजना गेल्या आपच्या सरकारने दिल्लीत लागू केली नव्हती. तर मोहल्ला क्लिनिक ही योजना राबवली होती. त्यामुळे आता भाजपचे सरकार आल्यानंतर मोहल्ला क्लिनिक हेच आयुष्मान आरोग्य मंदिर योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय दिल्ली सरकारकडून मोहल्ला क्लिनिकच्या स्थितीबद्दल तसेच हे आयुष्मान आरोग्य मंदिर योजनेत रूपांतरित करता येईल की नाही, याबद्दल अहवाल मागवणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय राष्ट्रीय राजधानीत आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना (AB-PMJAY) लागू करण्याचा विचार करणार आहे. याअंतर्गत ५१ लाख लोकांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाण्याची शक्यता आहे.
जर मोहल्ला क्लिनिक आयुष्मान आरोग्य मंदिरमध्ये रूपांतरित झाले आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. एका सूत्राने सांगितले की, मोहल्ला क्लिनिकमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल सरकार खूप चिंतेत आहे. मोहल्ला क्लिनिकची स्थिती आणि मोहल्ला क्लिनिकला आयुष्मान आरोग्य मंदिरमध्ये रूपांतर करता येईल की नाही, याबद्दल दिल्लीच्या नवीन आरोग्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला जाईल.
उपराज्यपालांनी दिले होते सीबीआय चौकशीचे आदेशदिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी जानेवारीमध्ये मोहल्ला क्लिनिक संदर्भात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मोहल्ला क्लिनिकद्वारे खाजगी प्रयोगशाळांना फायदा होण्यासाठी बनावट चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.