पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत कंपनी मालक वरुण आणि हरीश गोयल यांचे वडील अमरनाथ यांचाही मृत्यू झाला आहे. सांगण्यात येते की, ही आग लागली, तेव्हा मोटिवेशनल स्पीच सुरू होते. यावेळी अमरनाथही तेथे उपस्थित होते. मात्र, आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती, की त्यांना तेथून बाहेर पडता आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध अमरनाथ गोयल हे देखील इतर लोकांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर होरपळले होते आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे याप्रकरणी, कमर्शिअल बिल्डिंगमध्ये कंपनी चालविणाऱ्या हरीश गोयल आणि वरुण गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इमारतीचे मालक मनीष लाकडा सध्या फरार आहेत.
या तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होते. दुसऱ्या मजल्यावर वेअर हाऊस तर तिसऱ्या मजल्यावर लॅब होती. सर्वाधिक मृत्यू आतापर्यंत दुसऱ्या मजल्यावरच झाल्याचे बोलले जात आहे. या दुसऱ्या मजल्यावरच मोटिवेशनल स्पीच सुरू होते. या कार्यक्रमामुळेच येथे अधिक लोक एकत्रित आले होते.
30 हून अधिक बंब पोहोचले होते घटनास्थळी -या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या कोणत्याही जवानाला इजा झालेली नाही. सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी तैनात होत्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, 50 हून अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे, तर 27 लोकांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रात्री 11 वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.