दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, १२ जण जखमी झाले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं. हळूहळू आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० हून अधिक गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या इमारतीला अग्निशमन विभागाची एनओसीदेखील नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे.
या इमारतीत पहिल्या मजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं, तर दुसऱ्या मजल्यावर वेअर हाऊस आणि तिसऱ्या मजल्यावर लॅब होती. दरम्यान, दुसऱ्याच मजल्यावर सर्वाधिक जीवितहानी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर मोटिवेशनल स्पीच सुरू होती. या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी अनेक कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय छतावर एक छोटा फ्लॅटही तयार करण्यात आला होता.
३० पेक्षा अधिक बंब घटनास्थळीयामध्ये अग्निशमन दलाच्या कोणत्याही जवानाला इजा झाली नाही. सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी तैनात होत्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, ५० पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं, तर २७ लोकांची मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, रात्री ११ वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आल्याचंही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं.