दिल्ली महापालिकेच्या निकालाने भाजपाला पुरते हलवून टाकले आहे. १५ वर्षांची सत्ता आपने एकहाती हिसकावली आहे. आपने १३४ जागा मिळविल्या तर भाजपाला १०४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे दिल्ली महापालिकेवर आपचा महापौर बसणार आहे. परंतू यासाठी दिल्लीकरांना एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
दिल्लीच्या महापौर निवडणुकीसाठी एक नियम आडवा आला आहे. दिल्लीच्या तीन महापालिकांची एकच पालिका करण्यात आली आहे. यावेळी जे नियम बनविण्यात आले त्यातील एक नियम आडवा आला आहे. दिल्ली महापालिका कायदा अनुच्छेद ३५ नुसार महापौर आणि उपमहापौर निवडणूक दर वर्षी घेण्यात यावी असे म्हटले आहे. तसेच ही निवडणूक १ एप्रिलपासून सुर व्हावी असे म्हटले आहे. तीन महापालिका एकत्र केल्या तेव्हा या नियमात संशोधन करण्यात आले आहे. तसेच यातून एक वाटही ठेवण्यात आली आहे. जर काही समस्या आली तर केंद्र सरकार एक आदेश काढून ही अट शिथील करू शकते, असेही म्हटले आहे.
केंद्र सरकारकडे ही ताकद दोन वर्षांसाठीच देण्यात आली आहे. परंतू हा आदेश लोकसभा आणि राज्यसभेत पारीत करावा लागणार आहे. दिल्लीतील 250 निवडून आलेले नगरसेवक, 13 आमदार, लोकसभा खासदारांव्यतिरिक्त, दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत तीन राज्यसभा सदस्य मतदान करू शकतात. परंतू केंद्रात भाजपाचे सरकार आणि पालिकेत आपचे सरकार आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
दिल्लीमध्ये महापौर बसवायचा असेल तर पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या हातात आता सारे काही आहे. त्यांनी आदेश काढला नाही तर पुढील ३-४ महिने आप आणि भाजपात पुन्हा धुमश्चक्री पहावयास मिळणार आहे. याचा फायदा आपला देखील राज्यातील निवडणुकीसाठी होऊ शकतो.