दिल्लीतील नबी करीम भागातील जयदुर्गा धर्मकांटेजवळील फर्निचर शोरूमला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जवळपासच्या इमारतींचे शटर तोडून तब्बल ४४ जणांना बाहेर काढलं. पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या, ज्यांनी खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्याचबरोबर ही आग कशी लागली आणि किती नुकसान झाले याची माहिती सध्या उपलब्ध नाही. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र आगीमुळे फर्निचर कारखाना पूर्णपणे जळून राख झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आगीचे कारण शोधले जात आहे. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्येही दिल्लीत आग लागल्याची घटना समोर आली होती.
दक्षिण दिल्लीतील जगबीर कॉलनीत एका इमारतीला आग लागली. पार्किंगमध्ये लागलेली आग काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणारे २४ लोक त्यात अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ज्यांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तेथे अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत लहान मुलं आणि महिलांसह १४ जण जखमी झाले.