नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणामधीलशेतकरी दिल्लीच्या सीमेवर बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनदरम्यान पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी राघव चड्डा यांनी बातचीत केली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांनी जनरल डायर यांच्यासारखे आंदोलन करणार्या शेतकर्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत, असे राघव चड्डा म्हणाले. तसेच, देशातील शेतकरी आपले शत्रू आहेत का? ते चीन किंवा पाकिस्तान लष्कराचे जवान आहेत का? त्याच्याशी असे का वागले जात आहे? असे सवाल राघव चड्डा यांनी केले आहेत.
नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हळूहळू तीव्र होत आहे. रविवारी शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून दिल्लीच्या दिशेने पुढे आले. त्यानंतर दिल्ली-जयपूर महामार्गावरील मसानी गावाजवळ पोलीस आणि शेतकर्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी पुढे जाण्यावर ठाम होते. त्याचवेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराचा वापर केला.
दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीतून तोडगा निघेल आणि तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांचे आंदोलन लवकरच संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल, अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे.