नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (13 ऑक्टोबर) दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला होता. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदुषणात आणखी वाढ झाली आहे.
दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. सध्या हरियाणातील अलिपूर खालसा (351) आणि पानिपत (339) येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. हरियाणातील कर्नाल येथे पराली जाळल्यानंतर धूर दिल्लीत येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
सफर या प्रदूषण संसोधन संस्थेने परालीमुळे 15 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील प्रदूषणात सहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी कॅनॉट प्लेस परिसरात दिल्लीकरांना मास्क वाटले.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैमानिक व्ही. के सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून परतल्यामुळे वारे शांत आहेत. मात्र वाऱ्याची दिशा पश्चिम ते उत्तर पश्चिम अशी आहे. त्यामुळे पश्चिम आणि उत्तर पश्चिमेकडील प्रदूषित हवा पंजाब, हरियाणातून दिल्ली-एनसीआरकडे वाहत आहे. हरियाणातील पराली जाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पंजाबमध्ये पराली मोठ्या प्रमाणात जाळल्या जातात. 11 ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढले आहे अशी माहिती राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळातील आकडेवारीवरून मिळाली आहे.
पंजाब, हरियाणामध्ये पराली जाळण्यावर बंदी असतानाही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पराली जाळतात. सरकारकडून आधुनिक पद्धतीने पराली जाळण्यासाठी 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. दिल्ली-एनसीआरमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.