नवी दिल्ली - दिल्लीकरांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी तक्रार खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. तिवारी यांनी याबाबत केजरीवालांना एक पत्र लिहलं असून अशुद्ध पाण्याच्या संदर्भातील मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. केंद्रीय मंत्री व भाजपाचे नेते दिल्लीतील पाणी अशुद्ध असल्याचे खोटे दावे करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता.
केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री राम विलास पासवान यांनी बीएसआय अहवालाचा दुसरा भाग अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीतील पिण्याचे पाणी सर्वाधिक अशुद्ध असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. याचा संदर्भ देऊन तिवारी यांनी पत्रात 'बीएसआयच्या अहवालानुसार दिल्लीतील पाणी अशुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. मला काही लोकांनी फोन करून चिंता व्यक्त केली आहे. काही भागात मलवाहिन्यांची दुर्गंधी पिण्याच्या पाण्याला असल्याचे दिल्लीकर सांगत आहेत. हे सर्वांसाठी धोकादायक आहे. पण विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यास धोका संभावतो. आप सरकार, भाजपा आणि काँग्रेस या दिल्लीतील तिन्ही मुख्य पक्षांमध्ये पाण्यावरून सातत्याने राजकीय घमासान होत असते' असं म्हटलं आहे.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीमुळे या संघर्षाने अधिकच जोर धरला आहे. राजकारण करायचे असेल तर करा पण दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका. मोफत पाणी पुरवठ्याच्या नावावर आपण घाण पाणी देत आहात आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याचा दावा करत आहात असंही मनोज तिवारी यांनी केजरीवालांना म्हटलं आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील पाण्याच्या परीक्षणाला पूर्ण सहकार्य करू असे तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचवेळी नमुने तपासणीची मोहीम कधी सुरू होईल याच्या तारखा जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत आज चर्चा झाली. यामध्ये पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते, आता दिल्लीतील सर्व लोकं खोकत असल्याचे सांगत भाजपाचे खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली होती. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले होते. मात्र आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याचं म्हणत केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान दिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी 'पाण्यावरून राजकारण होत आहे. 11 ठिकाणच्या नमुन्यांच्या आधारे कोणत्याही शहरातील पाण्याला खराब ठरवलं जाऊ शकत नाही. पाण्याचे नमुने कोणत्या ठिकाणचे आहेत हे सांगितलं जात नाही. रिपोर्टमध्ये 2 टक्के पाण्याचे नमुने हे फेल झाले आहेत. दिल्लीमध्ये 1500 ते 2000 पाण्याचे नमुने घेण्यात येतील. दिल्लीतील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे पाहण्यासाठी रामविलास पासवान यांनी यावं आणि तपास करावा असं आव्हान देतो' असं म्हटलं आहे.