दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पूर्व दिल्लीतील आपचे लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. सुनीता केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली रोड शो दरम्यान आप नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभक्तीच्या घोषणाही दिल्या. पूर्व दिल्ली मतदारसंघातील कोंडली भागात मतदारांना हात जोडून अभिवादन सुनीता करताना दिसल्या. अरविंद केजरीवाल हे "शेर" आहेत आणि त्यांना कोणीही तोडू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
सुनीता केजरीवाल यांनी कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ आयोजित रस्त्यावरील लोकांना सांगितलं की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले कारण त्यांनी शाळा बांधल्या, मोफत वीज दिली आणि मोहल्ला क्लिनिक उघडले. प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करेल असं देखील सुनीता यांनी लोकांना आवाहन करताना म्हटलं आहे.
रोड शो दरम्यान, सुनीता केजरीवाल यांचा ताफा रस्त्यावरून जात असताना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे कट-आउट आणि निळ्य़ा-पिवळ्या आम आदमी पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने 'आप' समर्थक तेथे जमले आणि "जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल छूटेंगे" अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. 'आप'चा मित्रपक्ष काँग्रेसचे स्थानिक नेतेही त्यांच्या समर्थकांसह रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांची पत्नी आपच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करतील. या अंतर्गत सुनीता रविवारी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. सुनीता केजरीवाल दक्षिण दिल्ली आणि नवी दिल्ली मतदारसंघ तसेच गुजरात, हरियाणा आणि पंजाबमध्ये आप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.