नवी दिल्ली : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिषी यांच्याकडे शिक्षण, महसूल, वित्त, उर्जा, सार्वजनिक बांधकाम यासह १३ महत्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात असताना देखील आतिषी यांच्याकडे हीच खाती होती. सौरभ भारद्वाज या मंत्र्यांकडे आठ खात्यांचा भार आहे. मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत अतिषी यांनी सादर केलेला प्रस्ताव नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मंजूर केला आहे.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसैन या चार मंत्र्यांनी आतिषी यांनी आपल्या मंत्रिमंडळात सामील केले आहे. सुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेले मुकेशकुमार अहलावत हे या मंत्रिमंडळातील नवे सदस्य आहेत. सौरभ भारद्वाज यांच्याकडे पूर्वीच्या मंत्रिमंडळात जी खाती होती तीच कायम ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याकडे आठ खात्यांचा भार आहे.