नवी दिल्ली - शहरातील ओल्ड राजेंद्र नगर येथील IAS स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी शिरलं, त्यात अनेक मुलं अडकली. रेस्क्यू ऑपरेशन करत काही मुलांना वाचवण्यात आले. परंतु या दुर्घटनेत २ युवती आणि एका युवकाचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिल्ली सरकारने या घटनेचे न्यायालयीन तपासाचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे सिव्हिल सर्व्हिसची कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घटनेविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.
या दुर्घटनेत जीव गमवावा लागणाऱ्या तिघांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवले आहेत. यात मृत्यूमुखी पडलेला युवक हा केरळचा राहणारा होता. नेविन डाल्विन असं त्याचं नाव होतं. मागील ८ महिन्यापासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीतून पीएचडीचं शिक्षणही घेत होता. डाल्विन पटेल नगरमध्ये राहायचा. सकाळी १० वाजता तो लायब्रेरीत अभ्यासाला गेला होता. तर तान्या सोनी, श्रेया यादव या २५ वर्षीय युवतींचाही यात मृत्यू झाला. श्रेयाने जुलै महिन्यातच कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला होता. ती यूपीच्या आंबेडकर नगर जिल्ह्यातील बरसावा हाशिमपूर गावात राहणारी होती.
रेस्क्यू ऑपरेशन संपलं, ३ मृतदेह बाहेर काढले - पोलीस
या दुर्घटनेबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले की, ओल्ड राजेंद्र नगरच्या एका कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. यातून ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. त्याशिवाय या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याची सूचना दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी भरलं असून त्यात अनेक विद्यार्थी अडकल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर तातडीनं अग्निशमन दल, एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहचली तिथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्रेरी बनवण्यात आली होती. याठिकाणी बरेच विद्यार्थी अभ्यास करत होते. घटनेच्या वेळी ३० विद्यार्थी आत होते. त्यातील ३ विद्यार्थी आत अडकले. रेस्क्यू ऑपरेशननंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढले, त्यात २ विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश होता.
अवघ्या २-३ मिनिटांत भरलं पाणी
सुरुवातीच्या तपासात बेसमेंटमध्ये ही लायब्रेरी होती. तिथे अचानक पाणी भरू लागलं. रस्सी फेकून अनेकांना बाहेर काढण्यात आले. संध्याकाळी ७ च्या सुमारास आम्ही बाहेर निघत होतो, तेव्हा अचानक वेगाने पाणी आलं. जोपर्यंत आम्ही लायब्रेरी रिकामी करू तोपर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी भरलं होतं. पाण्याचा वेग इतका जास्त होता ज्यामुळे आम्हाला पायऱ्या चढत्या आल्या नाहीत. २-३ मिनिटांतच बेसमेंटमध्ये पूर्ण पाणी भरलं. जवळपास १०-१२ फूट हे पाणी होतं. त्याठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी रस्सी फेकण्यात आली परंतु पाणी खूप खराब असल्याने काहीच दिसत नव्हते असं एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितले.
४ पंपाने पाणी भरलं
बेसमेंटमध्ये एवढं पाणी भरले होते ज्यामुळे लायब्रेरीतील फर्निचर पाण्यावर तरंगत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे आले. मुसळधार पावसामुळे आधीच रस्त्यावर पाणी भरलं होतं. बेसमेंटमधील पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर पंपचा वापर करण्यात आला. ४ मोटरपंपच्या सहाय्याने पाणी बाहेर काढले.