नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 97 टक्के नमुन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की मृतांच्या गोळा केलेल्या 578 नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये असे दिसून आले की त्यापैकी 560 मध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट होता.
उर्वरित 18 (तीन टक्के) मध्ये डेल्टासह कोविड-19 चे इतर व्हेरिएंट होते, ज्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल आणि मेमध्ये संसर्गाची दुसरी लाट आली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण खूप वेगाने वाढले आहेत. बुधवारी दिल्लीतील केजरीवाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. भारतात पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. बुधवारी देशात 2000 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असे सांगितले जात आहे की दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांमध्ये गंभीर लक्षणे दिसली नाहीत. ओमायक्रॉन प्रकार प्राणघातक नाही, असेही यापूर्वी सांगण्यात आले होते.
दुसऱ्या लाटेत, 21,839 बेडपैकी 6 मे पर्यंत 20,117 (92 टक्के) बेड भरले होते. दिल्लीत पुन्हा एकदा संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोना विषाणूची संभाव्य चौथी लाट येण्याची भीती वाढली आहे. भारतातील दैनंदिन प्रकरणांमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी तीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली यांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर विशेष भर देऊन कोरोना नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले. दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडमध्येही मास्क परत लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत सलग दुसऱ्या दिवशी पाचशेहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबादमधील आकडेवारीही चिंतेचे कारण आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सोमवारी राज्याची राजधानी लखनऊसह राज्यातील सात शहरांमध्ये फेस मास्क घालणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली. याशिवाय, यूपी सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. आता फक्त दिल्लीतूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातूनही कोरोनाबाबत भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. दिल्ली एनसीआरच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की कोरोनाने यावेळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विळखा घातला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.