Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:34 PM2020-01-06T18:34:11+5:302020-01-06T18:36:01+5:30
2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता.
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता दिल्लीतील जनतेचा संभाव्य कल सांगणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने आज प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून दिल्लीमध्ये आपचीची सत्ता कायम राहणार असल्याचा कल दर्शवला आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष पुन्हा एकदा मोठ्या बहुमतासह विजयी होणार असून, भाजपा आणि काँग्रेसला दोन आकडी जागाही जिंकता येणार नाहीत, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरने आपल्या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपाल 59 जागा मिळतील. तर अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसला यावेळी काहीसा दिलासा मिळणार असून, काँग्रेसला 3 जागा मिळतील, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये वर्तवला आहे.
मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास आम आदमी पक्षाला 53 टक्के, भाजपाला 26 टक्के आणि काँग्रेसला 5 टक्के मते मिळतील. तर 16 टक्के मते इतर पक्षांच्या खात्यात जातील, असे एबीपी न्यूज-सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.
2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आप आणि काँग्रेसला मात देत दिल्लीतील सात पैकी सात जागांवर कमळ फुलवले होते. त्यावेळी 70 पैकी 65 विधानसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळाली होती. तर काँग्रेसला 5 मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तर आपला एकाही मतदार संघात आघाडी मिळाली नव्हती. मात्र दिल्लीतील मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेगवेगळा कौल देण्याचा कल पाहता दिल्लीतील राजकीय समीकरण गुंतागुंतीचे बनलेले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर आज वाजले. आज दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मुख्य मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यापासून दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे.