विकास झाडे नवी दिल्ली : वीज, पाणी मोफत देऊन दिल्लीत मजबूत पकड निर्माण केलेल्या आम आदमी पार्टीने पंजाब आणि गोवामध्ये दिल्ली पॅटर्नवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या फेब्रुवारी-मार्च मध्ये या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतील.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात २०१३ पासून आम आदमी पार्टीने दिल्लीत मजबूत पाय रोवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली ताब्यात यावी म्हणून प्रचंड परिश्रम घेतले परंतु दिल्लीकरांच्या मनात असलेले केजरीवालांचे स्थान अढळ राहिले. २०१५ आणि २०२० मध्ये आम आदमी पार्टीने क्रमश: ६७ आणि ६३ जागा जिंकून विक्रम स्थापित केला आहे.
केजरीवालांनी दिल्लीतील लोकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज, २० हजार लीटर मोफत पाणी, महिलांना डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास, शहिदांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत, मोहल्ला क्लिनिक, रेशन धान्याचे योग्य नियोजन केले आहे. केजरीवालांचा पेहराव अत्यंत साधा आहे, ते सतत लोकांच्या संपर्कात असतात, दिल्लीतील कोणीही व्यक्ती त्यांना सहज भेटून आपले प्रश्न मांडू शकतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजप आणि कॉँग्रेसलाही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आम आदमी पार्टीसमोर अद्याप उभे राहता आले नाही. आम आदमी पार्टीने २०१४ मध्ये देशभरात लोकसभेची निवडणूक लढवली होती. परंतु पंजाब शिवाय कुठेही या पक्षाला यश मिळू शकले नव्हते. २०१७ मध्ये विधानसभेसाठी गोवा आणि पंजाब मध्ये शक्ती पणाला लावली. गोव्यात ‘आप’ला भोपळा मिळाला मात्र, पंजाबमध्ये २० जागा जिंकून विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवता आले.