Delhi Police Encounter: गेल्या काही दिवसांपासून देशभरात पोलीस एन्काऊंटरच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळतयं. पोलिसांच्या रोखठोक कारवाईवर अनेकदा न्यायालयांकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. अशातच दिल्लीपोलिसांच्या लाईव्ह एन्काऊंटरचा व्हिडीओ समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनीच या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आरोपींनी अवैध शस्त्रे बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी एका कारवाईदरम्यान चकमकीनंतर चार गुन्हेगारांना अटक केली. एन्काऊंटरची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनीच त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरु तो शेअर केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सूत्रांनी बदरपूर उपविभागाला माहिती दिली की दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या एका कारमध्ये चार संशयित गुन्हेगार बेकायदेशीर शस्त्रे घेऊन फिरत आहेत.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बदरपूरचे पथक नाला रोड आणि अर्पण विहारजवळील लोहिया पुलावर सापळा रचला. त्यानंतर रात्री १२.१० च्या सुमारास एक राखाडी रंगाची कार अर्पण विहार येथून आली. ही कार माहिती देणाऱ्याने ओळखली. पोलिस पथकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता समोरील सीटवर बसलेल्या एका आरोपीने पिस्तूल बाहेर काढले. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर देत कारच्या पुढील चाकावर गोळीबार केला. यानंतर गाडी थांबली.
त्यानंतर पोलिसांनी चारही संशयितांना गाडीच्या बाहेर काढून ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता आरोपींकडून दोन पिस्तुले आणि दोन काडतुसे जप्त केली. आरोपींनी उत्तर प्रदेशातील मैनपुरीमधून शस्त्रे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही मोठ्या कटाच्या तयारीत होते. निशांत नगर उर्फ निशू (२९, रा. हसनपूर, आयपी एक्स्टेंशन पटपरगंज) विकी गुजर (२७, रा. भोपुरा, गाझियाबाद) आणि कुणाल उर्फ गोलू (२५, रा. गाझीपूर डेअरी फार्म, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.