नवी दिल्ली, दि. 08 - स्वयंघोषित गोल्डमॅन आणि वादग्रस्त विधान करून नेहमी चर्चेत राहणा-या स्वामी ओम याला दिल्ली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी ओम याला न्यायालयाने आरोपी म्हणून घोषित केल्यानंतर त्याला भजनपुरा परिसरातून दिल्ली क्राइम ब्रांचच्या इंटर स्टेट सेलने अटक केली. पोलीस उपायुक्त (क्राइम) मधुर वर्मा यांनी त्याच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या सीजन 10 मध्ये स्वामी ओम स्पर्धक होता. यावेळी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य आणि बेशिस्त वर्तणुकीमुळे तो चर्चेत आला होता. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी स्वामी ओम याच्यावर त्याचा भाऊ प्रमोद झा यांनी सायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वारंट बजावले होते. यावेळी त्याच्यावर तब्बल 11 सायकली चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याचबरोबर, गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील विकासनगर या ठिकाणी नथुराम गोडसेच्या जयंत्तीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पाहुणे म्हणून बोलविले होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान त्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित लोकांनी त्याला मारहाण केल्याचे समोर आले होते.