नवी दिल्ली, दि. 18 - देशाची राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदा या संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचे नाव शोमोन हक असे सांगण्यात येत आहे. या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ही कारवाई केली आहे. सेंट्रल दिल्लीतील विकास मार्गावरुन शोमोन हक याला काल रात्री (दि.17) अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षातील अल-कायदा या संघटनेच्या दहशतवाद्याला पकडण्याची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
शोमोन हक बिहारमधील किशमगंजजवळ राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्याच्या आयडीवरुन ही माहिती समजते. शोमोन हक गेल्या चार वर्षांपासून अल-कायदा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी अल-कायदा संघटनेने भारतात दहशवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, शोमोन हक 2013 मध्ये अल-कायदाच्या संपर्कात आला होता. त्याने अल-कायदासाठी दक्षिण आफ्रिका आणि सीरियामध्ये काम केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, त्याच्याकडून 4 काडतुसे, लॅपटॉप, फोन आणि बांगलादेशी सिम कार्ड जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शोमोन हक बांगलादेश आणि म्यानमारमध्येही अल-कायदा संघटनेचे काम सुरू केले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा भारताकडे वळवला. म्यानमार मधून पश्चिम बंगाल तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आलेल्या रोहिंग्या मुस्लिम तरुणांना चिथावणी देणे त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेणे यासाठी तो काम करत होता. आपल्या कामात तो काही स्थानिकांची मदत घेत होता, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त पी. कुशवाह यांनी सांगितले.