नवी दिल्ली: दिल्लीत इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राष्ट्रीय तपास संस्थेचा (NIA) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी उज्जामा याला अटक केली आहे. एनआयएने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पुणे प्रकरणातील फरार असलेला शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून तो दिल्लीत राहत होता. दिल्ली स्पेशल सेल अजूनही त्याची चौकशी करत आहे. शाहनवाजची चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलने दिल्लीत छापा टाकला, ज्यामध्ये आयएसच्या नवीन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. शहानवाजची चौकशी केल्यानंतर विशेष कक्षाने ३ ते ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
स्पेशल सेलने आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी दिल्लीबाहेरून पकडला गेला आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जिहादी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यादरम्यान दिल्लीत मोठ्या दहशतवादी घटनेची योजना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल याबाबत पत्रकार परिषदही घेऊ शकते.
NIA या दहशतवाद्यांचा घेतायत शोध
एनआयए अजून तीन संशयित दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. यामध्ये रिझवान अब्दुल उर्फ हाजी अली, अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान यांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या तीन संशयितांवर प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.