नवी दिल्ली : दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि कोलकातासह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत 3 ते 4 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे काल (बुधवार) रात्रीपासूनच दिल्लीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच, देशातील एअरपोर्ट्स, मॉल, सरकारी संस्थांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने शहरातील अनेक भागांमध्ये छापे टाकले. तसेच, दिल्ली पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री दिल्लीतील 9 ठिकाणांवर छापे मारले. यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीलमपूर आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील आणखी दोन ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले आहेत. यात जामिया नगर आणि पहाडगंज जवळील मध्य दिल्लीतील दोन ठिकाणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत घुसलेले हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी आहेत. हे दहशतवादी गेल्याच आठवड्यात दिल्ली शहरात शिरले आहेत. दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याची योजना दसरा, दिवाळी सणांच्या मुहूर्तावर आखल्याचे समजते. तसेच, या दहशतवाद्यांकडून शहरांतील बाजाराचे ठिकाण, मॉल, ट्रेन, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.