नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 75 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेसवर अधिक भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एका पोलिसाने पुढाकार घेतला आहे.
थान सिंह असं या पोलिसाचं नाव असून ते दिल्ली पोलीस दलात कार्यरत आहेत. गरीब मुलांना ते शिकवतात. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या साई मंदिरात त्यांचे वर्ग भरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांना शिकवणी बंद करावी लागली होती. गरीब घरांतून येणाऱ्या अनेक मुलांकडे स्मार्टफोन, संगणक आणि इंटरनेटच्या सुविधा नाहीत त्यामुळे ते ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणूनच थान सिंह यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला.
"मी खूप आधीपासून विद्यार्थ्यांचे क्लास घेत आहे. मात्र कोरोना संक्रमणामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी क्लास घेणं बंद केलं होतं. पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लास करू सकत नाहीत. कारण त्यांच्याजवळ फोन आणि संगणकासारख्या गोष्टी नाहीत तेव्हा मी पुन्हा एकदा क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला" अशी माहिती थान सिंह यांनी 'एएनआय'शी बोलताना दिली आहे.
पोलिसाने दिला मदतीचा हात, घेतली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी
आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्सचं पालन करत हे क्लास घेण्यात येत आहेत. मुलांना वर्गात मास्क आणि सॅनिटायझरही उपलब्ध करून दिलं जातं. वर्गात सोशल डिस्टन्सिंग पाळून मुलांचं शिक्षण सुरू असल्याची देखील माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोर 'शाळा' आणली आहे. मुलांसाठी त्यांनी मोहल्ला क्लासेस सुरू केले असून मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन शिकवत आहेत. आपल्या बाईकला एक ब्लॅकबोर्ड लावून ते प्रवास करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती मिळत आहे. रुद्र राणा असं या शिक्षकाचं नाव असून ते छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचे शिक्षक आहेत.
कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
कोरोनाच्या संकटात पोलीस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शांथप्पा जीदमनव्वर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा हे मजुरांच्या मुलांना मोफत शिकवत आहेत. ज्या मुलांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांना ते वेळात वेळ काढून शिकवतात.