नवी दिल्ली - देशात नागरिक सुधारणा विधेयकावरुन रणकंदन माजलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये नागरिक आक्रम झाले असून हिंसात्मक घटना घडत आहेत. नागरिक सुधारणा विधेयकाला विरोध करत विद्यार्थ्यांसह, तेथील नागरिकांनी मोठं आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची धग देशभर जाणवत असून दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळत आहे. दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला आहे. त्यावरुन, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे.
दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिल्ली पोलिस बसला आग लावताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे विनाकारण गाड्यांची तोडफोड पोलिसांकडून होत आहे. भाजपाकडून गलिच्छ राजकारण होत असून दिल्लीत भडकलेल्या हिंसेचा नि:पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही सिसोदिया यांनी केलीय.
लखनौमधील नदवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीही विधयेकास विरोध करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, पोलिसांनी कॉलेजचे गेटच बाहेरुन बंद केलंय. जामिया येथील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात येत आहे. तसेच, हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटी येथेही विद्यार्थ्यांनी जामिया येथील विद्यार्थ्यांना समर्थन देत आंदोलन सुरू केलं आहे.