Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसदेत घुसखोरी केल्यानंतर लोकसभा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली. यानंतर या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा मास्टरमाइंट असलेला ललित झा याने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ललितला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ललितलाही ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी दोन जणांनी लोकसभा सभागृहात गोंधळ घातला. यामुळे एकच खळबळ उडाली. या दोघांनी सभागृहात स्मोक अटॅक केला. यानंतर सर्वच खासदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणी विरोधकांनी केंद्रावर सडकून टीकाही केली. परंतु, संसदेत घुसखोरी करण्याचा नेमका हेतू काय होता, स्मोक अटॅक का करण्यात आला, याबाबत पोलिसांनी दिल्लीतीलन्यायालयात माहिती दिली.
संसदेत घुसखोरी करण्याचा हेतू काय होता?
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, ललित झा हा मास्टरमाइंड आहे. त्यामुळे या कटामागे किती लोक होते हे शोधण्यासाठी त्याच्या कोठडीची गरज आहे. पुरावे गोळा करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये जावे लागणार आहे. या कटात वापरलेले मोबाइलही जप्त करायचे आहेत. ललित झा याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. यानंतर ललित झा याची चौकशी करण्यात आली. या कटातील संपूर्ण सहभाग उघड करताना ललितने तोच मास्टरमाइंड कसा आहे हे सांगितले. ललितने या कटामागील सांगितलेला हेतू न्यायालयात सांगू शकत नाही, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, आम्हाला दाव्याची सत्यता आणि त्याच्या सहभाग याबाबत अधिक तपास करायचा आहे. सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात कसे आले याचाही शोध घ्यायचा आहे, असे दिल्ली पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. यावेळी ललित झा याची १५ दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ललित झा याची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.