नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीमध्ये दोन दहशतवादी घुसल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रंदेखील जारी करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांना कोठेही पाहिल्यास त्याची माहिती तातडीनं सांगण्यात यावी, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. हे दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या संशयित दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी पहाडडगंज पोलीस स्टेशनचे 011-23520787 आणि 011-2352474 हे दोन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत. रविवारी अमृतसर येथे निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला झाला होता. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबसहीत नवी दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यासाठी बुरखाधारी हल्लेखोरांनी वापरलेल्या ग्रेनेडसारख्या ग्रेनेडचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असण्याचाही संशय व्यक्त होत आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.