नवी दिल्ली: दिल्लीमधील तीस हजारी कोर्टच्या परिसरात पोलीस आणि वकिलांमध्ये शनिवारी हाणामारी झाली होती. यानंतर दिल्लीतील वकिलांनी सोमवारी संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या संपानंतर आता पोलिसांनी देखील हातावर काळी फित बांधत वकिलांसोबत झालेल्या हाणामारीचा निषेध व्यक्त करत योग्य न्याय मिळावा यासाठी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर पोलीस कर्मचारी आंदोलन करत आहेत.
आमच्यासोबत अन्याय होत असल्याने आम्ही शांततेत या विरोधात निषेध करत आहेत. पोलिसांना देखील योग्य वागणूक मिळून समान शिक्षा देण्यात यावी असं पोलिसांनी सांगितले. त्याचसोबत आम्ही या संर्दभात आयुक्तांसोबत देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. ज्यानंतर वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिली. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.