नवी दिल्ली- मजाक-मस्तीमध्ये 100 नंबरवर फोन करणाऱ्यांविरोधात पोलीस आता सक्तीची पावलं उचलताना दिसणार आहेत. टाइमपास करण्यासाठी जे लोक 100 या क्रमांकावर फोन करतात अशांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस कंट्रोल रुममध्ये वेगळा सेटअप तयार करण्यात आला आहे. यामाध्यमातून दररोज येणाऱ्या फेक कॉल व ब्लँक कॉलवर नजर ठेवली जाणार आहे.
100 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करणारे काही सीरीयल ऑफेंडरही आहेत. दारू पिऊन दररोज 100 नंबर फोन करून काही लोक उगाच बडबड करत असतात. तर काही जण मस्ती म्हणूनही फोन करतात. पोलीस कंट्रोल रुम अशांच्याच विरोधात कारवाई करते आहे. 100 नंबरवर फोन करुन पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे.
पोलीस कंट्रोल रुममध्ये येणाऱ्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवल्यावर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. जास्त फोन हे दारू प्यायलेली व्यक्ती करते. रात्री 10 ते 2 वाजेच्या सुमारास किंवा 1 ते 5 वाजेच्या सुमारास हे फोन कॉल्स येतात. याचबरोबर लहान मुलगा किंवा चुकून 100 नंबर डायल करणाऱ्यांची संख्या 40 टक्के आहे. 100नंबर डायले केल्यावर नक्की पोलिसांनाच फोन लागतो का? हे तपासून पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
फेक कॉल्सची संख्याही जास्त आहे. तक्रार मिळाल्यावर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचतात तेव्हा तिथे घटना घडलेलीच नसते तसंच तक्रारकर्ताही त्या ठिकाणी नसतो. फेक कॉल्समुळे अनेकदा खऱ्या गुन्ह्यांची माहिी पोलिसांपर्यंत वेळवर पोहचत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.