दिल्ली: राजधानी दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नमाज अदा करणाऱ्यांना लाथ मारणाऱ्या पोलीस स्टेशन प्रभारीला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच सोबत असलेल्या पोलिसावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यानं लाथ मारल्यामुळं प्रकरण चिघळलं. दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्यानं शुक्रवारी दुपारी इंद्रलोक पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन केले, त्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. लोकांनी गोंधळ घातल्याचं पाहून पोलिसांनी सावध पवित्रा घेतला. पोलिसाने मारहाण करताच संतापलेल्या लोकांनी इंद्रलोक पोलीस ठाण्याला घेराव घालून गोंधळ घातला. सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गैरवर्तनाचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी इंद्रलोक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही लोक नमाज अदा करण्यासाठी रस्त्यावर जमले आणि त्यांनी रांगेत नमाज अदा करण्यास सुरुवात केली. अशातच दिल्ली पोलिसांचे काही कर्मचारी तेथे पोहोचले. एका पोलीस कर्मचाऱ्यानं नमाज अदा करणाऱ्यांना मारहाण करताच तेथील एका तरुणानं पोलिसांना जाब विचारला. हे पाहून नमाज अदा करणारे लोक उभे राहिले आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या असभ्यतेचा निषेध केला.