Tractor Rally Violence: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून पोलिसांवर हल्ला केलेल्यांना धडा शिकविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आंदोलकांचा सामना करण्यासाठी पोलिसांना आता स्टीलच्या लाठ्या देण्यात येणार आहेत. दरम्यान, दिल्लीत पोलिसांकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारात तब्बल ४०० पोलीस जखमी झाले होते. यातील काही पोलिसांवर तलवार, लोखंडी रॉडसारख्या हत्यारांनी हल्ला करण्यात आला होता. अलीपूरचे पोलीस अधिकारी प्रदीप पालीवाल यांच्यावर एका आंदोलकानं केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात पालीवाल गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळे आंदोलकांच्या अशा जीवघेण्या हत्यारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खास स्टीलच्या लाठ्या तयार केल्या आहेत. दिल्लीच्या शाहदारा जिल्ह्यात या लाठ्या तयार करण्यात आल्याअसून सध्या अशाप्रकारच्या ५० लाठ्या पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
"पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करताहेत"; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी निर्धारित मार्ग सोडून टॅक्टर रॅली घेऊन गेल्यानं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. यात शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ठिकठिकाणी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. पण शेतकरी आंदोलकांनी अधिक आक्रमक भूमिका घेत लाल किल्ला ताब्यात घेतला होता. लाल किल्ल्यावर आंदोलकांना धुडगूस घालून पोलिसांनाही अमानूष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या तोडफोडीची घटना देशविरोधी कृत्य असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.